काँग्रेस पक्ष अहंकारी असल्याची टीका करतानाच ‘मोदी-3’ सरकारला पुढील 5 वर्षे समर्थन देऊ, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धर्मनिरपेक्ष जनता दलाचा समावेश केल्याबद्दल देवेगौडा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शपथविधीच्या कार्यक्रमास हजर राहू शकत नाही, असेही देवेगौडा यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्रात सरकार स्थापन करीत असल्याबद्दल आपले अभिनंदन. देवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली आहे, असे सांगून देवेगौडा पत्रात म्हणतात की, मागील दशकभरात ज्याप्रमाणे तुम्ही देशाची सेवा केली, त्याप्रमाणे आगामी काळातही देशसेवा कराल. आजचा क्षण हा ऐतिहासिक आहे. काँग्रेस पक्ष आपल्या कामगिरीत सुधारणा झाल्याचा दावा करीत आहे. कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेस तडफडत आहे तर अन्य काही राज्यांत पक्षाला जे काही यश मिळाले आहे ते त्यांच्या सहयोगी पक्षांमुळे. सहयोगी पक्षांसोबतची त्यांची आघाडी किती दिवस राहील, हाही प्रश्न आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष म्हणून मोदी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेनुसार धर्मनिरपेक्ष जनता दल काम करेल. - एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान