बेळगाव—belgavkar—belgaum : प्रत्येक गोष्टीत भाषिक वाद आणून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांची कोल्हेकुई पुन्हा दिसून येत आहे. महापालिकेवर मोर्चा काढून महापौर, उपमहापौर आणि आमदारांवर कारवाई करावी, अशी हास्यास्पद मागणी करत त्यांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला. त्यामुळे, शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आले होते. त्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपावेळी 'जय महाराष्ट्र' अशी घोषणा दिली. त्यावेळी तिथे उपस्थित आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांनीही दाद दिली. याबद्दल कन्नड संघटनांना पोटशूळ उठले आहे. त्यामुळे, महापालिकेसमोर जाऊन धुडगूस घातला जात आहे.
तेव्हापासून विविध कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर धिंगाणा घातला जात आहे. त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुतळ्याचे अनावरण झाल्यापासूनच कन्नड संघटना बिथरल्या आहेत. शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करत असून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.