बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी : क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तलवार हल्ल्यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला. सूरज आबा कांबळे (वय 24) असे त्याचे नाव आहे.
रविवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घटना घडली. याप्रकरणी खुनी हल्ला आणि अॅट्रॉसिटी गुन्हा अथणी पोलिसांत दाखल झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षापासून येथील दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक होत होती. रविवारी शर्यत बघून गावी आल्यानंतर क्षुल्लक कारणावरून दोन गटांत शाब्दिक चकमक सुरू झाली.
यावेळी राजू कांबळे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा नातेवाईक सूरज कांबळे त्यांना वाचविण्यासाठी पुढे गेला असता त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद होता. तिघांनी तलवार हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अथणी पोलिसांत नोंद झाली आहे. घटनास्थळी अथणी पोलिस उपअधीक्षक प्रशांत मनोळी,सीपीआय संतोष हळ्ळूर, पीएसआय मल्लाप्पा उपारयांनी पाहणी केली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.