बेळगाव—belgavkar—belgaum : बारमध्ये झालेल्या भांडणानंतर भररस्त्यावर एकाचा खून करण्यात आला. मुडलगी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली असून यासंबंधी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुडलगी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण यमनाप्पा मरनूर (वय 47, रा. रंगापूर, ता. मुडलगी) असे खून झालेल्या दुर्दैवीचे नाव आहे.
लाथाबुक्क्यांनी मारून त्याचा जीव घेण्यात आला आहे. यासंबंधी रंगाप्पा दुंडाप्पा पाटील, रा. रंगापूर व इराण्णा महादेव तुंगळ, रा. कमलदिन्नी या दोघा जणांवर एफआयआर दाखल केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या लक्ष्मणची पत्नी रेखा मरनूर हिने फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती समजताच गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भररस्त्यावर झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून पोलिसांनी रंगाप्पा व इराण्णा यांना ताब्यात घेतले आहे. मुडलगी येथील जीप सर्कलजवळ असलेल्या जेनेरिक मेडिकल शेजारील रस्त्यावर ही घटना घडली आहे. लक्ष्मणला खाली पाडवून त्याला लाथाबुक्क्यांनी छातीवर, चेहऱ्यावर व डोक्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना नेमकी कशासाठी झाली? याचा तपास करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार बारमध्ये झालेल्या भांडणानंतर रंगाप्पा व इराण्णा यांनी लक्ष्मणचा खून केला आहे.