Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इंडिया आघाडीत असलेले आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता आमनेसामने आले आहे. तेव्हा दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप असा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. अशातच आपचे अरविंद केजरीवाल यांनी वोटिंग बूस्टिंगवरुन भाजपावर टीका केली होती. या टीकेला भाजपाचे नेते परवेश वर्मा यांनी उत्तर दिले आहे.
अरविंद केजरीवाल : भाजपा वोटिंग बूस्टिंगसाठी नवा पर्याय शोधला आहे. भारतीय जनता पक्ष देशभरातून लोकांना दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी लोकांचे स्थलांतर करत आहेत. यासाठी पक्षाचे नेते, खासदारांच्या घराच्या पत्त्याचा वापर केला जात आहे. भाजपाच्या परवेश शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 33 नवीन मतदार कसे तयार झाले? एका रात्रीमध्ये 33 लोक परवेश शर्मा यांच्या घरी कसे काय पोहोचले? असे म्हटले होते.
या आरोपावर पलटवार करताना परवेश वर्मा यांनी 'मी आधी पश्चिम दिल्लीत खासदार होतो. तेव्हा मी, माझं कुटुंब, माझा स्टाफ असं सर्वाचं मतदान द्वारकामध्ये होत असे. आता पक्षाने नवी दिल्लीतून निवडणूक लढण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. तेव्हा मी मतदानाची जागा शिफ्ट केली. मी जेथे राहतो, तेथेच मतदान करतो', एएनआय पॉडकास्टमध्ये त्यांनी हे विधान केले.
परवेश वर्मा यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल एक पत्ता विसरले. तो पत्ता राहुल गांधींच्या घरचा पत्ता आहे. त्यांच्या घरातून 24 मत दिली जातात. त्यांचं तर लग्न सुद्धा व्हायचंय, त्यांना मुलंही नाही आहेत. माझं लग्न झालंय आणि मला मुलंबाळं सुद्धा आहेत. मी आता कुटुंबासह सर्व स्टाफच्या मतदानाची जागा शिफ्ट केली आहे.