बेळगाव—belgavkar—belgaum : बेडकिहाळ-बोरगाव मार्गावरील बेडकीहाळ हद्दीतील बाबर (टाकळे) यांच्या शेती शेजारील प्रमुख मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश महालिंग स्वामी (वय 52 रा. चांदशिरदवाड (ता. निपाणी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, प्रकाश महालिंग स्वामी हे बेडकिहाळहून शिरदवाडकडे चालत जात होते. रात्री 8.30 च्या दरम्यान अज्ञात वाहनाने प्रकाश स्वामी यांना जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मारबसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
येथील काही वाहनधारकांनी याची माहिती सदलगा पोलिसांना दिली. उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व साहाय्यक पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्वामी यांची ओळख पटताच शिरदवाड येथील ग्रा. पं. सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली आहे. घटनास्थळी मोटारसायकलीचे इंडिकेटर फुटून पडल्याचे निदर्शनास आले होते. यावरून अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याचे स्पष्ट होते. मयत प्रकाश यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.