काँग्रेस पक्षाचे नवे मुख्यालय 'इंदिरा भवन'चे उद्घाटन झाले आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन केले. या समारंभात बोलताना राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी भाजप-आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. खर्गे यांनी आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'खरे स्वातंत्र्य' या विधानावर जोरदार निशाणा साधला. 'जर ते अशी विधाने करत राहिले, तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल,' असे खर्गे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नव्या काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पक्ष नेत्यांना संबोधित करताना म्हणाले, आरएसएस आणि भाजपच्या लोकांना 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य आठवत नाही, कारण त्यांच्या वैचारिक पूर्वजांचे स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नव्हते. त्यांनी कधी स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, कधी तुरुंगात गेले नाही, म्हणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल काही आठवतच नाही. आमच्या लोकांनी लढा दिला होता, प्राण गमावले होते, यामुळे आम्हाला स्वातंत्र्य आठवते.
तत्पूर्वी, मोहन भागवत सोमवारी म्हणाले होते की, अयोध्येत रामललाच्या प्रतिष्ठापनेची तिथी 'प्रतिष्ठा द्वादशी' म्हणून साजरी करायला हवी. कारण अनेक शतकांपासून होणाऱ्या शत्रूच्या आक्रमनांणा तोंड देणाऱ्या देशाला या दिवशी खरे स्वातंत्र्य मिळाले. भागवतांच्या या विधानावर निशाणा साधत खर्गे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळूनही ते हे स्वीकारत नाहीत, ही शरमेची गोष्ट आहे.'
खर्गे म्हणाले, 'मी भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि ते अशीच विधाने करत राहीले, तर त्यांचे भारतात फिरणेही कठीण होईल.' मात्र का कठीण होईल हे त्यांनी सांगितले नाही.