Maha Kumbh 2025 : कधी समाजाने वेड्यात काढले, तर कधी घरच्यांनीही वेडा ठरवले. ही गोष्ट आहे IIT मुंबईमधून एअरनॉटिकल इंजीनिअरींग करणाऱ्या अभय सिंह यांची. मूळ हरियाणाच्या हिस्सारचा रहिवासी असलेले अभय सिंह सध्या कुंभमेळ्यात बाबा झालेत. अभयला जीवनाचे सत्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा होती, म्हणूनच त्यांनी भक्तीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला.
काशीतील जुना आखाड्याच्या संतांनी अभयला कुंभमेळ्यात आणले. एका हिंदी वृत्तवाहिनीने सर्वात आधी अभयची मुलाखत घेतली, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. IIT सारख्या संस्थेत अनेकांना Admission मिळत नाही. अशा संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अभयने हा मार्ग निवडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयुष्यात अनेक गोष्टी केल्या, पण सत्याचा शोध लागला नाही. याच सत्याच्या शोधात भक्तीमार्ग निवडल्याचे अभय सांगतात.
आयुष्यात पैसा अन् भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्यांसाठी अभय सिंहची कहानी प्रेरणादायी ठरू शकेल. हिंदी वृत्तवाहिनीशो बोलताना अभय सांगतात की, ते कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत. ते कुठल्याही पंथाशी, आखाड्याशी संबंधित नाहीत. त्यांनी कोणत्याही महाराजांकडून दीक्षाही घेतलेली नाही. मी साधू-संत नाही, मला फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचे आहे, म्हणून इथे आलोय, असं अभय सांगतात.
अभयने सांगितले की, आयआयटी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याची काळजी वाटू लागली. कोणत्याही प्रवासाची सुरुवात प्रश्नांनी होते, माझ्याही मनात अनेक प्रश्न होते. आयुष्यात नेमकं काय हवंय, हा प्रश्न मला पडला होता. मला आयुष्यभर करता येईल, मनाला सुख देईल, अशी गोष्ट शोधायची होती. IIT नंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. झोप येत नव्हती, रात्रभर मनात प्रश्नांचे वादळ उठायचे...मग मला वाटले की, माझी अशी अवस्था का झालीये? मला झोप येत नाहीये, कुठेच मन लागत नाहीये...त्यानंतर मी मानसशास्त्राचा अभ्यास केला. पुढे इस्कॉनकडे वळलो अन् श्रीकृष्णाबद्दल वाचण सुरू केले.
हळुहळू मी अध्यात्माकडे वळालो, ध्यान करू लागलो, मला आयुष्याचा अर्थ समजू लागला. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले. घरच्यांनीही मला वेडा समजले. त्यांचे विचार वेगळे होते, माझे विचार वेगळे होते. मला कुठेच अडकायचे नव्हते, म्हणून मी घर सोडले अन् देशभर प्रवास केला. पायी चारधाम यात्रा केल्या, अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या अन् शेवटी काशी गाठली. काशीला येऊन बाबा सोमेश्वर पुरींना भेटलो अन् त्यांनीच पुढे आध्यात्माचा मार्ग दाखवला.