बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेल्या चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जोमाने सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात कुसमळी ते कणकुंबीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित रस्ता येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच सदर रस्त्याचे दोनवेळा (डबल कोटींग) डांबरीकरण करण्यात येणार आहे.
कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कणकुंबी येथे रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला चालना दिली होती. हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही केली होती. परंतु कणकुंबी वनखात्याकडून रस्त्याच्या कामात आडकाठी आणली होती. त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्वरित जिल्हा वनाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा करुन वनखात्याचा गैरसमज दूर केला. त्यानंतर कणकुंबी ते चोर्ला हद्द रस्त्यांपैकी मोठ्या प्रमाणावर असलेल्या खड्यांचे जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क करून पावसाळ्यात सदर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला होता.
बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. सध्या कुसमळी ते कणकुंबीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग 748 ए. ए. हा रस्ता बेळगाव विभागांतर्गत येत आहे. बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
कुसमळीतील पूल पाडवणार : कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने तो धोकादायक बनला आहे. म्हणून नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती. नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर नसून, रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीतूनच मलप्रभा नदीवरील पूल बांधण्यात येणार आहे. सदर पूल आता इतिहास जमा होणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आता नवीन पूल 90 मिटर लांब तर साडेपाच मिटर रुंद होणार आहे. येत्या 3-4 दिवसांत पूल पाडवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. नदीतून पर्यायी रस्ता तयार : सध्या नदीत मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. जुना पूल काढून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. ब्रिटीशकालीन पूलाला सव्वाशे वर्षे झाली आहेत. 8 कमानीचा पूल असून दगडी बांधकाम करण्यात आले होते. आता सदर ब्रिटिशकालीन जुना पूल इतिहास जमा होणार आहे. पर्यावरण आणि वन खात्यामुळे चोर्ला रस्त्याचे दुपदरीकरण रद्द : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चोर्ला रस्त्यावरील वाहतुकीचा ताण ओळखून रस्त्याचे दुपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु पर्यावरण प्रेमींनी व वनखात्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आडकाठी घातल्याने सदर रस्त्याचे काम थांबले. राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागांतर्गत बेळगाव विभागीय राष्ट्रीय महामार्गाच्या सीपीसी मोडवर चोर्ला रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या रस्त्यामुळे बेळगाव आणि गोवा अशी इंधन आणि वेळेची बचत करणारा रस्ता गोव्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी चोर्ला रस्ता हा मुख्य रस्ता समजला जातो. आता डांबरीकरणामुळे पुन्हा एकदा वाहनांचा वेग वाढणार असून धोकादायक वळणे घातक ठरणार आहेत.