बेळगाव—belgavkar—belgaum : काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बंगळुरातील बैठक आटोपून रात्री बेळगावला परत येणाऱ्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला मंगळवारी सकाळी अपघात झाल्याने त्यांच्यासह त्यांचे बंधू आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी तसेच कारचालक आणि सुरक्षा रक्षक असे एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. पैकी मंत्री हेब्बाळकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले. तर आ. हट्टीहोळ्ळींसह इतर दोघांनाही उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले.
पुणे-बंगळूर महामार्गावर बेळगावच्या कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी गावाजवळ कार आली असता दोन कुत्रे अचानक आडवे आल्याने त्यांना वाचवण्यासाठी चालकाने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता, कार रस्त्याशेजारच्या झाडाला धडकली, घडक जोरदार होती. मात्र वेळीच कारच्या एअर बॅग उघडल्याने फक्त जखमांवर निभावले, अशी माहिती पोलिसांकडून तसेच हेब्बाळकर कुटुंबीयांकडून देण्यात आली. पोलिस तसेच डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री हेब्बाळकर यांच्या पाठीला व मानेला दुखापत झाली आहे. आमदार हट्टीहोळी यांना चेहरा व खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. चालक शिवप्रसाद व समोर बसलेला गनमॅन इराण्णा यांना किरकोळ मार लागला आहे.
मंत्र्यांसह सर्वांवर विजया हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. तिघांना घरी जाऊ देण्यात आले, तर मंत्री हेब्बाळकर यांच्यावर आता एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना तीन दिवसांनी घरी जाऊ देण्यात येणार आहे. अधिक माहिती अशी : सोमवारी बंगळूरमध्ये झालेली काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक तसे काँग्रेस प्रभारी रणदीप सूरजेवाला यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली काँग्रेसची बैठक संपवून रात्रीच्या वेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, त्यांचे बंधू आ. चन्नराज हट्टीहोळी हे बंगळूरहून बेळगावला कारने परतत होते. चालकाच्या बाजूला गनमॅन बसला होता. त्यांच्या मागच्या आसनावर मंत्री हेब्बाळकर तर वाहन चालकाच्या मागे आ. हट्टीहोळी बसले होते. पहाटे पाचच्या सुमारास कार कित्तूरजवळील अंबडगट्टी येथे पोहोचली. समोरून निघालेल्या कंटनेरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक पाठोपाठ दोन कुत्रे धावत कारसमोर आले. समोरील कंटेनर टाळण्यासाठी व कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतल्याने ती सर्व्हस रोडवर जाऊन शेजारच्या झाडावर आदळली.
धडक इतकी जोरदार होती की कारमधील चारीही एअरबॅग खुल्या झाल्या. यामध्ये समोर बसलेले गनमॅन व चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र मंत्री हेब्बाळकर यांच्या मणक्याच्या हाडांना तसेच मानेला दुखापत झाली आहे. आ. हट्टीहोळी यांच्या उजव्या खांद्याला, कपाळाला व चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच रामदुर्गचे उपअधीक्षक चिदंबरम, पोलीस निरीक्षक शिवानंद व कित्तूरचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हॉस्पीटलला भेट देऊन मंत्री हेब्बाळकर यांची विचारपूस केली. अपघाताची नोंद कित्तूर पोलिसांत झाल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्र्यांसह सगळे सुरक्षित : आ. हट्टीहोळी उपचार घेतल्यानंतर आ. चन्नरहाज हट्टीहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्र्यांच्या पाठीला व मानेला दुखापत झाल्याने त्यांना बोलताना त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मंत्री, मी, तसेच चालक व गनमॅन सर्वजण सुरक्षित असून काळजी करू नये. मी सुरक्षित : मंत्री हेब्बाळकर मला काहीही झालेले नाही. थोडीशी दुखापत आहे. ती ठीक होईल. मोठ्या संख्येने रुग्णालयाकडे येऊ नका. लवकरच मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे महिला, बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. मंत्री हेब्बाळकर यांच्या पाठीला दुखापत झाल्याने त्यांना किमान महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार आहे. तीन दिवस रूग्णालयात ठेवून त्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जाईल. त्यांच्या व अन्य तिघांची प्रकृतीही धोक्याबाहेर आहे, असे विजया हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.