बेळगाव—belgavkar—belgaum : नशेबाज तरुणांनी येडियुराप्पा रोडवरील बळ्ळारी नाल्यानजीकच्या शेतवडीतील गवतगंजीला आग लावल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. यामध्ये मारुती मंडोळकर या शेतकऱ्याचे सुमारे 30000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नशेबाज तरुणांवर पोलिसांनी आवर घालावा, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिकडे तिकडे खुलेआम गांजाची विक्री करण्यासह त्याचे सेवन केले जात आहे. त्यामुळे नशेबाज तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रात्रीच्यावेळी शेतवडीमध्ये पार्टी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी रात्री येडियुराप्पा रोडवरील बळ्ळारी नाल्यानजीक काही तरुण शेतवडीत बसले होते.
नशेत त्यांच्याकडून गवतगंजी पेटवून देण्यात आली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. रात्री 11.15 च्या दरम्यान आगीची घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गवतगंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यामुळे सर्व गवतगंजी जळून खाक झाली. यात शेतकरी मारुती मंडोळकर यांचे 30000 रुपयांचे नुकसान झाले आहे. येडियुराप्पा रोडवर रात्री उशिरापर्यंत नशेबाज तरुणांचा वावर असतो. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.