बेळगाव—belgavkar—belgaum : किरकोळ कारणातून पैलवानाने गवंड्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना नुकतीच गुडीकट्टीत (ता. बैलहोंगल) घडली आहे. याप्रकरणी दोडवाड पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे. बसवराज रामण्णा कुंभार (वय. 42, रा. कटगेरी ता. गुळेगुड्डू, जि. बागलकोट) असे मृताचे नाव आहे. तर बसवराज कल्लय्या पुजेर (वय 58, रा. गुडीकट्टी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
बसवराज कुंभार गुडीकट्टी गावात फार्म हाऊसचे बांधकाम करत होता. यावेळी संशयित पुजेर त्याला बांधकामाबाबत सूचना करत होता. तुला काय समजते मिस्त्री येऊ दे असे त्याने त्याला म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यातून पैलवान असलेल्या पुजेरने त्याला मारहाण केली. दगडाने डोक्यात जबर मारहाण केल्यामुळे बसवराज कुंभारचा जागीच मृत्यू झाला.
त्याला अडवण्यासाठी इतर काहीजण गेले असता त्यांनाही पुजेरने धमकी दिली. खून करून रक्ताने माखलेल्या कपड्यासह तो हा दोडवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
