येत्या काही दिवसांत कर्नाटकात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदार बसनगौडा यत्नाळ पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या गटांमधील अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यत्नाळ गट गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटून राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहे, तर विजयेंद्र गट भाजपा पक्षांतर्गत निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये बैठक घेणार आहे.
दरम्यान, लवकरच चांगली बातमी येणार असल्याचा दावा यत्नाळ गटाकडून केला जात असून, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्या यांना माजी राज्यमंत्री बी श्रीरामुलू यांचे कडवे आव्हान असणार असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री जी एम सिद्धेश्वर यांनी दिल्लीत सांगितले की, लवकरच “हाय कमांड चांगली बातमी देईल.” यावर त्यांना “चांगली बातमी” काय आहे असे विचारले असता, त्यांनी जास्त काही न बोलता उत्तर दिले की, “तुम्हाला समजू शकते की ही चांगली बातमी काय असेल.”
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी एल संतोष यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या यत्नाळ गटाने विजयेंद्र यांची जागी श्रीरामुलू यांची निवड करण्याचा सल्ला दिला होता. जानेवारीमध्ये झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माजी मंत्री विजयेंद्र यांच्याशी मतभेद झाले होते.
विजयेंद्र गटाची 12 फेब्रुवारी बैठक होणार असल्याच्या वृत्ताला, माजी राज्यमंत्री एम.पी. रेणुकाचार्य यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही हायकमांडकडे आमचे काही प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत. जर विजयेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला तर भाजपला कर्नाटकात 10 जागाही मिळणार नाहीत. राष्ट्रीय नेत्यांना या परिस्थितीची जाणीव आहे. ते विजयेंद्र यांना हटवणार नाहीत आणि अध्यक्षपदी तेच कायम राहतील.” माहितीनुसार, “भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हायकमांडने निवडलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरु आहेत.”
