बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर झालेल्या लोकायुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना निलंबित केले आहे. लोकायुक्त छाप्यात त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तहसीलदार गायकवाड यांनी बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याचा आरोप करत दोघा माहिती हक्क कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली होती. याबाबत लोकायुक्तांकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार लोकायुक्त पोलिसांनी बेळगाव चौथ्या अतिरिक्त विशेष जिल्हा सत्र न्यायालयातून शोध वॉरंट घेऊन 8 जानेवारी रोजी तहसीलदारांशी संबंधित बेळगाव, खानापूर, निपाणीतील सहा ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी तहसीलदार गायकवाड यांच्याकडे उपलब्ध मालमत्तांच्या स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत आढळून आले. कर्नाटक लोकायुक्त विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला.
प्रकरणाच्या सुरळीत तपासात तहसीलदार गायकवाड यांच्याकडून अडथळा येणे तसेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता ओळखून त्यांची मूळ स्थानावरून अन्यत्र बदली करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. त्यानुसार महसूल विभागाचे सचिव मुख्तार पाशा एच. जी. यांनी गायकवाड यांच्या निलंबनाचा आदेश बजावला आहे. त्याची प्रत जिल्हाधिकार्यांनाही पाठविली आहे.
कित्तूरचे तहसीलदार रवींद्र हादीमनी यांच्याकडे खानापूर तहसीलदार पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. निलंबनाच्या काळात निर्वाह भत्ता काढण्यासाठी गायकवाड यांची धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाचे तहसीलदार म्हणून बदली करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी बजावला आहे.तालुक्यातील चौथे निलंबनतालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या बेबंदशाहीला सामान्य जनता कंटाळली आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षकांसह भूमापन आणि भूमी अभिलेख विभागातील तीन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यानंतर खुद्द तहसीलदारांवर निलंबनाची नामुष्की ओढविल्याने अधिकार्यांचे धाबे दणाणलेत.
