बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : तब्बल 25 वर्षानंतर होत असलेल्या नंदगड (ता. खानापूर) येथील लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा काळात मद्य विक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मंगळवार दि. 11 रोजी रात्री 8 वाजल्या पासून सोमवार दि. 24 रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत गावातील दारू दुकाने व बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नुकताच नंदगड गाव आणि परिसरात मद्य विक्रीला बंदी असल्याचा आदेश जारी केला आहे. यात्रेत होणारी संभाव्य गर्दी आणि व्यवस्थेचा विचार करून जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी मद्यबंदी लागू करण्याची शिफारस केली होती. नंदगड येथे 12 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पर्यंत लक्ष्मी यात्रोत्सव होत आहे. 25 वर्षानंतर ही यात्रा होत असल्याने यात्रेत अभूतपूर्व गर्दी होणार आहे. सामाजिक शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी पोलीस खात्याने दारू विक्रीला बंदी घालण्याची मागणी केली होती.
त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवार दि. 24 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत नंदगड गावातील सर्व मद्य विक्री दुकाने व बार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्नाटक अबकारी कायदा 1965 कलम 32 नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नंदगड यात्रोत्सव कमिटीने यापूर्वीच आहेराच्या प्रथेला फाटा दिला आहे. त्याशिवाय यात्रा काळात डीजेलाही निर्बंध लादले आहेत. त्याबरोबरच आता दारू विक्रीला बंदी घालून प्रशासनाने निर्विघ्न यात्रेसाठी धडपडणाऱ्या यात्रा कमिटीच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे.
