बेळगाव—belgavkar—belgaum : गोवावेसमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारलेल्या खाऊ कट्टा येथे पत्नींच्या नावे गाळे असल्यामुळे भाजपचे नगरसेवक मंगेश पवार आणि जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक आयुक्तांनी बजावला. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी 9 नोव्हेंबर 2023 आणि 29 नोव्हेंबर 2023 रोजी प्रादेशिक आयुक्त कार्यालयात प्रभाग 41 चे नगरसेवक मंगेश पवार आणि प्रभाग 23 चे नगरसेवक जयंत जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या दोन्ही नगरसेवकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खाऊकट्टा येथील गाळा क्रमांक 28 नीता मंगेश पवार आणि गाळा क्रमांक 29 सोनाली जयंत जाधव यांना दिला आहे. आपल्या पत्नींच्या नावाने गाळे भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्यामुळे महापालिका कायद्याचा भंग झाला असून, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी या तक्रारीच्या आधारे संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी महापालिका आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचे अहवाल 8 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक आयुक्त शेट्टेण्णावर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. याच प्रकरणावरून नगर प्रशासन खात्याच्या सचिवांनी प्रादेशिक आयुक्तांना पत्र लिहून प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रादेशिक आयुक्तांनी तक्रारदार मुळगुंद आणि नगरसेवक पवार व जाधव यांच्या सुनावण्या घेतल्या. दोन्हीकडून लेखी उत्तरे देण्यात आली. खाऊ कट्टा येथील दुकानांचे गाळे हे रस्त्यावर किरकोळ भाजीपाला, साहित्याची विक्री करणार्या गोरगरीब, विधवा महिलांना व अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, नगरसेवकांनी बेकायदेशीर पद्धतीने येथील गाळे घेतले आहेत. त्यामुळे, पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचे मुळगुंद यांनी लेखी तक्रारीत म्हटले होते.
प्रादेशिक आयुक्त शेट्टेण्णावर यांनी सुनावणीतील सर्व घटनाक्रम आदेशपत्रात नोंद केला आहे. त्यामध्ये दोघांनीही नगरसेवक म्हणून निवडून येण्याआधी आपल्या पत्नींच्या नावे सरकारी बांधकामातील गाळे भाडेतत्त्वावर घेतले आहेत; पण नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी गाळे परत देणे आवश्यक असताना कुटुंबाच्या माध्यमातून गाळे वापर सुरु केला. त्यामुळे कर्नाटक महापालिका कायदा 1976 कलम 26 अन्वये उपकलम (1)(के)चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे, त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याचा निर्णय देण्यात येत आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सभागृहात काय होणार? : सभागृहात भाजपचे 35 नगरसेवक आहेत. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार असून, एकीकडे निवडणुकीच्या द़ृष्टीने जोरदार तयारी सुरु असतानाच दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. नगरसेवक काय करणार? प्रादेशिक आयुक्त शेट्टेण्णावर यांनी मंगेश पवार आणि जयंत जाधव यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा निर्णय दिला आहे. आता दोघेही या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार का, याची उत्सुकता आहे. इतिहासात पहिल्यांदाच सरकारी गाळ्यांमुळे नगरसेवकपद जाण्याची घटना महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. याआधी जातीचे प्रमाणपत्र, सीमाप्रश्नाचा ठराव या कारणांनी अनेकांचे सदस्यत्व गेले आहे; पण पत्नीच्या नावे सरकारी गाळे घेतल्यामुळे पद जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
