Retired IAS officer assaulted over Rs 10 fare dispute, shocking video goes viral : 10 रुपये जादा भाडे देण्यास नकार दिल्यानं एका बस कंडक्टरने 75 वर्षीय माजी आयएएस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलीय. जयपुरच्या कानोता येथे ही धक्कादायक घटना घडली असून, थांबा आल्यानंतरही बस कंडक्टरने त्यांना कल्पना दिली नाही. नंतर 10 रुपये जादा तिकीटाचे पैसेही मागितले. ज्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, याप्रकरणी कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
यासंदर्भात कानोता पोलीस ठाण्यातील एसएचओ उदय यादव सांगतात, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आरएल मीना असं त्यांचं नाव असून, ते नायला रोड कानोता येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त अधिकारी जयपुर येथून नायला येथे त्यांच्या निवासस्थानी जात होते. त्यांनी तिकिट देखील काढले. आग्रा रोडवरील कानोता बस स्टँडवर त्यांना उतरायचे होते. मात्र, बस कंडक्टरने त्यांना थांब्याची माहिती दिली नाही. बस त्यानंतर नायला येथील पुढील स्टॉपवर पोहोचली.
माजी अधिकाऱ्यांनी कंडक्टरला जाब विचारला. मात्र, बस कंडक्टरने मीना यांना धक्काबुक्की केली आणि 10 रुपये जादा पैसे मागितले. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी प्रतिउत्तर देताना कंडक्टरच्या कानाखाली मारली. त्यानंतर कंडक्टरने त्यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारे दोघांमध्ये हाणामारी झाली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त अधिकाऱ्यांना वाचवले. 10 रुपये भाडे आणि नायला बसस्थानकावर न उतरवल्याने हा वाद झाल्याची माहिती आहे.
Please click here to Watch this Video or photo on X (Twitter)
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी आयएएस अधिकाऱ्यांनी कानोता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास करीत जयपुर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने, गैरवर्तणूक आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल आरोपी कंडक्टर घनश्याम शर्माला निलंबित केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
![logo top](https://www.belgavkar.com/images/news/pg-logo-top.webp)