बेळगाव—belgavkar—belgaum : एका महिलेच्या नावावर असलेला भूखंड भलत्याच महिलेला पुढे करून लाटण्यात आला आहे. भूखंडाची मूळ मालकीण असलेली महिला रत्ना मब्रुकर (वय 68, रा. माळमारुती एक्स्टेन्शन, कणबर्गी रोड, बेळगाव) यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद मार्केट पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये पुरखान महंमदगौस चौधरी (रा. पिरनवाडी), श्रीमती अशराप शाबुद्दिन टिनवाले (रा. आसदखान सोसायटी), तौसिफ शाबुद्दिन टिनवाले (रा. आसदनखान सोसायटी), मल्लिकार्जुन रमेश हंचिणमनी (करगुप्पी, ता. बेळगाव), कार्तिक मारुती राजाप्पगोळ (करगुप्पी, ता. बेळगाव) व हुबळी (आनंदनगर) येथील एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे.
रत्ना या पुण्यात वास्तव्यास आहेत, त्यांच्या नावे महांतेशनगर (कणबर्गी रोड) येथे सर्व्हे नं. 9449 येथे 40 बाय 50 फुटांचा भूखंड आहे. त्यांनी हा भूखंड 1985 मध्ये बुडाच्या लिलावामध्ये खरेदी केलेला असून त्याची उपनोंदणी विभागात रितसर नोंदणी देखील केली आहे. त्याची सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. वर्षातून एकदा येथे येऊन सदर वृद्धा आपला भूखंड पाहून जात होत्या. सन 2023 मध्ये त्यांनी या भूखंडाचा करदेखील भरलेला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये बेळगाव महापालिकेत त्या कर भरण्यासाठी गेल्या तेव्हा हा भूखंड त्यांच्या नावावर नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी उपनोंदणी कार्यालयात जाऊन पाहिले असता 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्या भूखंडाचा परस्पर व्यवहार उपरोक्त 6 जणांनी मिळून केल्याचे आढळून आले. पैकी अनोळखी असलेल्या महिलेला रत्ना असे दाखवून तिला नोंदणी अधिकाऱ्यांसमोर उभे करून हा व्यवहार केला गेल्याचा संशय आहे.
खोटी कागदपत्रे तयार करून भूखंड विकला : आपल्याकडे मूळ कागदपत्रे असताना खोटी कागदपत्रे तयार करून भूखंड विकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तशी फिर्याद रत्ना यांनी मार्केट पोलिसांत दिली आहे. हा व्यवहार उपनोंदणी कार्यालयात झाल्याने मार्केट पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे
