बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्ह्या शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे सतीश जारकीहोळी फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रीय पुरुष व महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात करण्यात आले. प्रत्येक गटाची प्राथमिक फेरी घेण्यात आली. यावेळी गटातील 10 जण अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले असून यातील 5 जणांना पारितोषिक मिळणार आहे. गुरुवारी सायंकाळी 'मि. इंडिया' किताबाचा मानकरी ठरणार आहे.
बुधवारी सायंकाळी अंगडी कॉलेज आवारातील मैदानात भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशनचे संस्थापक संचालक मधुकर तळवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पठारे, फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी रमेशकुमार, अर्जुन पुरस्कार विजेते टी. व्ही. पॉली, खजिनदार नवनीतसिंग,उपाध्यक्ष तुलसी सुब्रह्मण्यम, विक्रम रोटे, माजी प्रांतपाल अविना शपोतदार, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर (बँड अम्बेसेडर) उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वजनी गटातील स्पर्धा घेण्यात आली. खेळाडूंनी कसरती सादर केल्यानंतर अंतिम फेरीसाठी 10 शरीरसौष्ठवपटूंची निवड पंचांनी जाहीर केली. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, पंच, शरीरसौष्ठवपटू तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते