बेळगाव—belgavkar : मराठा आरक्षणासोबतच सीमाप्रश्नही प्रत्येक मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आपण सीमाप्रश्नासाठी लक्षवेधी आंदोलन करू, असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मनोज जरांगे पाटील यांनी केले. शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटी (जिलना, महाराष्ट्र) येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली.
आजवर महाराष्ट्रात झालेल्या प्रत्येक मराठा समाजाच्या आंदोलनात सीमाप्रश्नाची मागणी अग्रणी होती. यापूर्वी झालेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यामुळे यापुढेही मराठा आंदोलनात सीमाप्रश्नाचा समावेश असावा, अशी मागणी समिती नेत्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे केली. आपण बेळगाव येथे भेट देऊ, अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बोलावून आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, विनोद आंबेवाडीकर, प्रकाश गडकरी, लक्ष्मण मेणसे, मारुती मरगणाचे आदी उपस्थित होते.