IND vs NZ 1st ODI Live : भारताचा अनुभव कमी पडला; केन विलियम्सन, टॉम लॅथम जोडीने रेकॉर्ड ब्रेक भागीदारी करून सामना जिंकला

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात पराभूत केले

न्यूझीलंडने अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात पराभूत केले. भारताच्या 307 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण,  कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम या जोडीने 200+ धावांची भागीदारी केली आणि मॅच जिंकली. शिखर धवनकडून सुटलेला झेल, शार्दूल ठाकूरने एका षटकात दिलेल्या 25 धावा अन् गोलंदाजांकडे अनुभवाची असलेली कमतरता यामुळे भारतीय संघाला हार मानावी लागली.


उम्रान मलिक व अर्शदीप सिंग यांनी पदार्पणात चांगली कामगिरी केली, परंतु अनुभवातून हे गोलंदाज आणखी बहरतील.
शिखर धवन (72) आणि शुबमन गिल (50) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना 124 धावांची भागीदारी केली. रिषभ पंत (15) व सूर्यकुमार यादव (4) हे अपयशी ठरले. श्रेयस अय्यर (80) व संजू सॅमसन (36)  यांनी 77 चेंडूंत 94 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारासह नाबाद 37 धावा केल्या. भारताने 7 बाद 306 धावा उभ्या केल्या.  प्रत्युत्तरात न्यूझीलंडने फिन अ‍ॅलन (22), डेव्हॉन कॉनवे (24) आणि डॅरील मिचेल (11) यांना 88 धावांत गमावले.  कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांनी डाव सावरला.
36व्या षटकात ही जोडी तोडण्याची संधी भारतासाठी चालून आली होती, परंतु शिखर धवनने किवी कर्णधार केनचा सोपा झेल टाकला. उम्रान व अर्शदीप यांचा अनुभव कमी पडत होता आणि किवींची अनुभवी जोडी त्याचा फायदा उचलताना दिसली. शार्दूलच्या एका षटकात त्याने 6, 4, 4, 4, 4 अशा धावा चोपल्या. लॅथमने त्या षटकात 25 चेंडू चोपून शतक पूर्ण केले. लॅथमने 76 चेंडूंत हे शतक झळकावले. भारताविरुद्धचे हे त्याचे दुसरे (2017) शतक ठरले. केन व लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी 151* धावांची केलेली भागिदारी ही इडन पार्कवरील सर्वोत्तम ठरली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डॅरल कुलियन व जॅक्स कॅलिस यांनी 145 धावांची भागीदारी केली होती. 
लॅथमने त्या एका षटकात भारताच्या विजयाच्या स्वप्नांचा चुराडा केला. न्यूझीलंडने 47.1 षटकांत 3 बाद 309 धावा करून विजय मिळवला. केन 98 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 94 धावांवर,तर लॅथम 104 चेंडूंत 19 चौकार व 5 षटकारांसह 145 धावांवर नाबाद राहिले.