बेळगाव : हरवलेल्या मानसिक युवकाला मानसिक आधार केंद्राद्वारे त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोचवण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी केले आहे. केस कापण्यासाठी गेलेला धामणे जवळील मास्केनट्टी या गावातील फकीरप्पा पाटील हा 36 वर्षीय युवक गावातून दिवसभर फिरत फिरत रात्री अनगोळ येथे फिरताना आढळून आला. त्याला पाहून तेथील युवकांनी त्याची चौकशी केली व त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने पाहून त्यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशनला कळवले.
युवकाची मानसिक स्थिती लक्षात घेता त्याची खासबाग येथील निराधार केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर बाब समाजसेविका माधुरी जाधव व गौतम कांबळे यांना समजताच त्यांनी त्या युवकाशी संपर्क साधून त्याची चौकशी केली असता तो धामणे येथील मास्केनट्टी या गावातील असल्याचे कळाले. त्वरित जाधव यांनी गावातील परिचयाच्या लोकांशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला व फकीरप्पा याला त्यांच्या स्वाधीन केले.
फकीरप्पा गावात अचानक दिसेनासा झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी गावात तसेच आजूबाजूची सर्व गावे पालथी घातली. फकीरप्पा हरवल्याचे मेसेजही सोशल मिडीयावर होते. पण फकिरप्पा शहरात असल्याने त्याचा ठवठिकाणा लागला न्हवता. त्यामुळे पाटील कुटुंबीय काळजीत होते. पण समाजसेविका माधुरी जाधव यांच्या प्रयत्नाने या युवकाला पुन्हा त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. याकरिता पाटील कुटुंबीयांनी समाजसेविका माधुरी जाधव आणि गौतम कांबळे यांचे आभार मानले. टिळकवाडी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर दयानंद शेगुनशी व हवालदार सुजाता वल्लेपुरम यांचे सहकार्य लाभले.