sexual-abuse-assault-rape-woman-girl-sex.jpeg | बेळगाव : खेळण्याच्या वयात लादले मातृत्व; 'ती' बनली आई | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खेळण्याच्या वयात लादले मातृत्व; 'ती' बनली आई

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बालविवाहाचे आणखी एक प्रकरण बुधवारी (24 फेब्रुवारी) उघडकीस आले. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या युवतीच्या आधार कार्डावरून मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती डॉक्टरांना समजली. 15 - 16 हे वय तिचं शाळेत जाण्याचं अन् खेळण्या-बागडण्याचं. परंतु, पालकांनी तिचे लग्न लावून दिले व 17 व्या वर्षी ती आई बनली. विशेष म्हणजे कमी वय असल्याचे माहिती असूनही पालकांनी तिला प्रसुतीसाठी सरकारी रूग्णालयात दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला. आता तिच्या पतीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कायद्यानुसार मुलाचे वय 21 तर मुलीचे 18 असणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामीण भागात नव्हे, तर शहरातही अद्याप मुलीला 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होत असल्याचे आढळून आले आहे. असाच प्रकार बेळगावात उघडकीस आला आहे. गर्भवती युवतीला प्रसुतीसाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी जेव्हा या मुलीचे आधारकार्ड पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, मुलीचे वय अवघे 17 नोंदवले गेले होते. अशा प्रकरणामध्ये डॉक्टर कसलीही जोखीम घेत नाहीत. त्यांनी ही माहिती महिला व बालकल्याण खात्याला कळवली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात येऊन माहिती घेतली असता पालकांनी तिचा बालविवाह केल्याचे स्पष्ट झाले.
महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी तपासासाठी जिल्हा रुग्णालयात गेले. त्यांनी चौकशी सुरु केली तेव्हा आणखी एक बालमाता बनल्याचे आढळून आले. आता दोन्ही प्रकरणांमध्ये पतींविरोधात बालअत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे अधिकृतरित्या लग्न परंतु, बालविवाह केल्याने हे दोन्ही पती सध्या अडचणीत आले आहेत. महिला व बालकल्याण खात्याकडे गेल्या वर्षभरात 115 बालविवाहाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 108 बालविवाह खात्याने थांबवले आहेत. त्या-त्या वेळी छापे टाकल्याने हे शक्य झाल्याचे बालसंरक्षण अधिकारी रवी रत्नाकर यांनी सांगितले.