नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी ध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
लाल किल्ल्यावर तिरंगा हटवून ध्वज फडकवण्यात आल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. तर काही जण फोटो, व्हिडीओ शेअर करत लाल किल्ल्यावर तिरंगा तसाच फडकत असून त्याशेजारी ध्वज फडकवला गेल्याचा दावा करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून आता आंदोलकांचा शोध घेतला जात आहे. लाल किल्ल्यावर ध्वज फडकवणारी व्यक्ती पंजाबच्या तरण तारण जिल्ह्याची रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे तरुणाची ओळख सांगणारा दावा त्याच्या नातेवाईकांनीच केला आहे. आपल्या नातेवाईकानं ध्वज फडकवल्याचा दावा करणारा व्हिडीओ त्यांनी अभिमानानं पोस्ट केला आहे.
2 मिनिटं 21 सेकंदाच्या व्हिडीओवरून अनेक दावे
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ 2 मिनिटं 21 सेकंदांचा आहे. त्यामध्ये व्हिडीओ फडकवणाऱ्या तरुणाचं नाव जुगराज सिंह असल्याचं सांगितलं जात आहे. तो पंजाबच्या तरण तारणचा रहिवासी आहे. व्हिडीओमध्ये जुगराजचा एक नातेवाईकदेखील दिसत आहे. हा नातेवाईक जुगराजच्या वडील आणि आजोबांचा परिचय करताना दिसत आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर जुगराजनंच खालसा पंथाचा निशाण साहिब झेंडा फडकावल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये जुगराजचे आजोबा अभिमानानं आपल्या नातवाला आशीर्वाद करताना दिसत आहेत.