BJP_Congress.jpeg | बेळगाव : भाजपातर्फे माजी मुख्यमंत्र्यांचे तर काँग्रेसतर्फे आमदार जारकीहोळींचे नाव चर्चेत | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : भाजपातर्फे माजी मुख्यमंत्र्यांचे तर काँग्रेसतर्फे आमदार जारकीहोळींचे नाव चर्चेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

लोकसभा पोटनिवडणूक Belgaum Loksabha

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रलंबित आहे. तारीख जाहीर झाली नसली तरी काँग्रेस व भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने प्रभावी उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याने भाजपनेही कंबर कसली आहे.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांत काही स्थानिक नेत्यांबरोबरच माजी मुख्यमंत्री व विद्यमान अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव आघाडीवर आहे. मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी दिवंगत अंगडी यांच्या कुटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी देण्याची चर्चा सुरु असतानाच काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी यांचे नाव पुढे आल्याने भाजपने वेगळा विचार चालविला आहे. दिवंगत अंगडी यांचे निकटवर्ती व माजी मुख्यमंत्री शेट्टर यांचे नावही आता चर्चेत आहे. श्री. शेट्टर दिवंगत अंगडी यांचे निकटवर्तीय असले तरी बेळगाववर त्यांची काहीशी पकडही आहे. बेळगावचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे मतदारसंघाचा त्यांना अभ्यास आहे.
माहितीनुसार, श्री. शेट्टर यांचे नाव हायकमांडच्या पातळीवर चर्चेत आले आहे. जातीय राजकारणाच्यादृष्टीने त्यांचे नाव हायकमांडला योग्य वाटते. त्याशिवाय माजी राज्यसभा सदस्य व केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांचे नावही पुढे आले आहे. केपीसीसीचे उपाध्यक्ष जारकीहोळी यांचे नाव काँग्रेसकडून पुढे आले आहे. बेळगावात शनिवारी निवड समिती अध्यक्ष एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांनी आमदार जारकीहोळी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. हायकमांडच्या निर्णयाशी मी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी पोटनिवडणूक लढविण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळे, जारकीहोळी यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास तितक्याच ताकदीचा उमेदवार देणे भाजपला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे, भाजप गोटात आता हालचालींना वेग आला आहे.