benadi-nipani-taluka-youth-missing-belgaum-nipani-police-investigation-murdered-202010.jpg | बेळगाव : बेपत्ता युवकाचा सुपारी देऊन खून; खूनाची सुपारी आणि बेपत्ता तक्रारही त्यानेच दिली | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बेपत्ता युवकाचा सुपारी देऊन खून; खूनाची सुपारी आणि बेपत्ता तक्रारही त्यानेच दिली

belgavkar.com | belgaum | belgavkar

मृतदेह पोत्यात घालून दरीत फेकला

बेळगाव ता. निपाणी : निपाणी भागात प्रथमच सुपारी देऊन खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये खुद्द फिर्याददार चुलत्याने संपत्तीसाठी पुतण्याचाच काटा काढून त्याचा खून केल्याची धक्‍कादायक बाब असल्याचे सीपीआय सत्यनायक यांनी सांगितले. बेनाडी (ता. निपाणी) येथील विशाल उर्फ आप्पासो महेश पाटील (वय 25) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार खुद्द काकानेच महिन्याभरापूर्वी दिली होती. पण त्यानेच सुपारी देऊन खून घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. संपत्तीच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याचा सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार बेनाडी गावात उघडकीस आला आहे. 6 लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणण्यात आला. काकानेच आपला पुतण्या बेपत्ता झाल्याची तक्रार महिनाभरापूर्वी नोंदवली होती. गेल्या 27 सप्टेंबर रोजी विशाल हा सकाळी 8 च्या सुमारास आपल्या मालकीची कार वॉश करून येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो बर्‍याच वेळानंतरही परतला नाही. 30 सप्टेंबर रोजी विशालचा काका सतिश दादासाहेब पाटील याने स्वत: निपाणी ग्रामीण पोलीसांत जाऊन विशाल बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
nipani-taluka-benadi-village-youth-murdered-supari-killer-belgaum-nipani-benadi-20201028.jpg | बेळगाव : बेपत्ता युवकाचा सुपारी देऊन खून; खूनाची सुपारी आणि बेपत्ता तक्रारही त्यानेच दिली | belgaum news | belgavkar बेळगावकर
पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाचे गूढ उलगडताना काकासह एकूण 5 जणांना अटक केली आहे. सुपारी देणारा त्याचा काका सतीश दादासाहेब पाटील (वय 45, रा. बेनाडी), तसेच अमोल प्रकाश वडर (वय 36, रा. बेनाडी), दिलीप परशराम वडर (वय 38), बाबासाहेब पांडुरंग कांबळे (वय 47, दोघे रा. व्हन्नाळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) व विकास पाटील (वय 25, रा. खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. तपासात सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी गावाजवळ पोलिसांना यमाई तलावाजवळ विशालची 9 ऑक्टोबर रोजी इर्टीगा कार बेवारस स्थितीत पोलीसांना आढळून आली. त्यानुसार सांगोला पोलिसांनी कारवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी निपाणी ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधला. निपाणी पोलिसांचा संशय बळावल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्‍त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, चिकोडी उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय संतोष सत्यनायक, उपनिरीक्षक बी.एस. तळवार यांनी विशेष पथकाची स्थापना केली.
पथकाने सांगोला पोलिसांनी हस्तगत केलेली कार ताब्यात घेवून तक्रारदार सतिश याच्याकडे बेपत्ता विशालबाबत विचारणा केली. मात्र, सतिशने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सतीशच्या मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली. त्यानुसार सतिशने अमोल वडर, दिलीप वडर, विकास पाटील, बाबासाहेब कांबळे यांना विशालचा खून करण्यासाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले. वरील सर्वांनी 27 सप्टेंबररोजी विशालला घराबाहेर बोलावून घेवून माळावरील घरातच त्याचा गळा आवळून मृतदेह पोत्यात घालून तो अणदूर (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील दरीत फेकून दिल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार पोलीसांनी प्रथम सतिशला ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखविला. त्यानुसार सतिशने खुनाची कबुली दिली. विशाल हा व्यसनी मुलगा होता. शिवाय आपल्या संपत्तीत अडसर येत होता. त्यामुळे त्याचा आपण काटा काढण्याच्या हेतुने त्याच्या खुनाची रेकी केली होती. पहिल्या टप्प्यात वरील चारही संशयितांना 1.5 लाख अ‍ॅडव्हान्स दिले होते. शिवाय 5 ऑक्टोबर रोजी उर्वरित 4 लाख रक्कम दिल्याची कबुली याने दिली.
पोलिसांनी सतिशच्या सांगण्यावरून वरील चारही संशयितांना विशाल याच्या खून प्रकरणी अटक करून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा नोंद केला. सतिश व अमोल या दोघांची रविवारी व सोमवारी निपाणी न्यायालयाने बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. तर, मंगळवारी दिलीप, विकास व बाबासाहेब या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी दिल्याची माहिती सीपीआय सत्यनायक यांनी दिली. सुपारीसाठी घेतलेल्या रकमेपैकी 2.83 लाख रूपये जप्त केल्याचेही त्यांनी सांगीतले. कारवाईत सहायक उपनिरीक्षक एस. ए. तोळगी, एस. आय. कंबार, पोलीस कर्मचारी एस. ए. गळतगे, प्रकाश सावोजी, संजय काडगौडर, असगरअली तहसिलदार, पारेश गस्ती, एल. एस. कोचरी, कलगोंडा पाटील यांनी सहभाग घेतला. एका महिन्यात या प्रकरणाचा छडा लावल्याने जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी निपाणी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. अशा प्रकारे खुनाचा उलगडा होताच पोलिसांनी संशयित आरोपी सतीश पाटील व अमोल वड्डर यांना प्रथम ताब्यात घेतले. नंतर मंगळवारी दिलीप वड्डर, विकास पाटील, बाबासाहेब कांबळे या तिघांना ताब्यात घेतले.