belgaum-taluka-mannikeri-village-mahalaxmi-temple-robbery-belgaum-temple-202010.jpg | बेळगाव : गावातील महालक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी; चोर्‍यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : गावातील महालक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी; चोर्‍यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मण्णीकेरी गावातील महालक्ष्मी मंदिरात चोरी करून चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने तसेच हुंडीतील सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. लक्ष्मी गल्ली मण्णीकेरी येथील महालक्ष्मीमंदिरामध्ये चोरट्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार तसेच गाभाऱ्याचे प्रवेशद्वार तोडून ही चोरी केली आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात धार्मिक स्थळांमधील चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर
मंदिरातील हुंडी मध्ये सुमारे दीड लाख रुपये निधी होता. वर्षभरात एकदा ही हुंडी फोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांनी यामध्ये मोठी रक्कम असल्याचा अंदाज बांधून ही चोरी केली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे देवीच्या अंगावरील सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीचे दागिने देखील चोरट्यांनी लंपास केले आहेत.

या घटनेमुळे चोरट्यांनी आता ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य बनवून ऐवज लंपास करण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्यातील काही मंदिरात मागील महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत परिसरात खळबळ माजली असून चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणी काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोरीच्या घटना अशा आहेत.
मोदगा गावातील दोन मंदिर
येळ्ळूर येथील दोन मंदिरे
मुचंडी गावातील मंदिर
मंडोळी येथील मंदिर
कलखांब येथील महालक्ष्मी मंदिर
कलखांब येथील ब्रम्हलिंग मंदिर
त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्‍वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कलखांब येथे यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
जिल्ह्यात अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोर्‍यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर आणली आहे. अनेक मंदिरांमधून रोख रुपये, देव-देवतांचे साहित्य चोरीला गेले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांतील मंदिरात चोरीच्या घटना घडत आहेत. सध्या शहर आणि उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठेवले आहे. घरफोड्या चोऱ्या याचबरोबर दरोडे सारखे प्रकार घडत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीच्या वस्तू यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या काही काळात काही छोट्या-मोठ्या मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोर्‍या उघड झाल्या असल्या तरी पोलिस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरातील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील देव असुरक्षित झाले असल्याचे दिसून येते.