scam.jpeg | बेळगाव : वय 26, दाखविले 62 वर्षे ; पेन्शनवर डल्ला... होय मी लाभार्थी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वय 26, दाखविले 62 वर्षे ; पेन्शनवर डल्ला... होय मी लाभार्थी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : उचगाव सर्कलमधील पेन्शन स्कँडलचे प्रकरण उघडकीस आल्याने अधिकाऱ्यांसह एजंटांचे धाबे दणाणले आहेत. पेन्शन स्कँडल उघडकीला आणणाऱ्या व्यक्तीचा आता शोध घेतला जाऊ लागला असून अनेकांकडून याची विचारपूस सुरू झाली आहे. बेळगाव तालुक्यातील हे पेन्शन स्कँडल सध्या गाजत असून प्रकरणाची माहिती असूनही तहसील कार्यालयाकडून चुप्पी साधली आहे. उचगाव सर्कलमधील या स्कँडलचे थेट कनेक्शन बेळगाव तहसीलदार कार्यालयापर्यंत पोचले असल्याने अनेकजणांचा यात समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनच आता या प्रकरणाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
पेन्शन स्कँडल अंतर्गत वर्षाने येळ्ळूर परिसरात एकाच कुटुंबातील 6 अपात्रांना पेन्शन मंजूर करुन दिली आहे. यात 26 वर्षीय विवाहित महिलेचा समावेश असून तिला 62 वर्षीय दाखविण्यात आले आहे. विवाहितेसह तिचा पती, सासू, सासरे तसेच घरातील इतर दोन सदस्यही शासनाच्या पेन्शनवर डल्ला मारत आहेत. वर्षाने हा कारनामा करून दाखविला असून तिला याच परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानातील कामगार युवकाने मदत केली आहे. राजहंसगड गावासह परिसरातील सुळगे (येळ्ळूर), देसूर, नंदीहळ्ळी गावात स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्या ‘जादू’गाराने परिसरातील अनेक बनावट लाभार्थींना बीपीएल शिधापत्रिका मंजूर करुन दिली आहे. यासाठी प्रत्येकी 7 हजार रुपये आकारण्यात आले आहेत. या जादूगाराचा संपर्क वर्षाशी आला होता. त्या माध्यमातून या दोघांनी राजहंगडासह परिसरातील अनेक गावांत अपात्रांना पेन्शन मंजूर करुन दिली आहे.
परिसरातील एका कुटुंबाशी सदर जादूगाराचा संपर्क आला. या कुटुंबाला त्याने बीपीएल शिधापत्रिकाही मिळवून दिली आहे. त्याने घरातील सर्वच सदस्यांना ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी पेन्शन मंजूर करुन देण्याची हमी दिली होती. त्यानुसार घरात 6 सदस्य असून प्रत्येकी 3 हजार रुपये पेन्शनसाठी देण्याची कबुली घेण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना पेन्शन लागू झाली आहे. यात 1994 साली जन्मलेल्या मुलीचाही समावेश आहे. या घरातील प्रत्येक सदस्याच्या आधारकार्ड क्रमांकासह त्यांची नावे सध्या उपलब्ध झाली असून या प्रकरणाचीही चौकशी केली जाणार आहे.
गावातील काही सामाजिक कार्य करणाऱ्यांनीही आता त्याविरोधात आवाज उठविण्याचे ठरविले आहे. शासनाकडून पेन्शनचा लाभ घेणाऱ्या अपात्रांची यादीच तयार करण्यात आली आहे. ही यादी आता भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दिली जाणार असून समितीने बनावट पेन्शनसंदर्भात यापूर्वीच पुरावे जमा करण्यास सुरवात केली आहे. राजहंसगड गावातील अपात्र लाभार्थी, त्यांची जन्मतारीख व आधारकार्ड क्रमांकच समितीकडे दिले जाणार आहे.

त्यात 27 अपात्र लाभार्थींच्या नावाचा समावेश आहे. यासह सुळगे (येळ्ळूर), नंदीहळ्ळी, देसूर परिसरातील यादीही तयार केली जात आहे. या अपात्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जावी, अशी मागणीही होत आहे. ज्या कुटुंबांना पेन्शन मंजूर करून देण्यात आली आहे, ते सर्वजण श्रीमंत असून त्यांना बीपीएल शिधापत्रिकाही मिळवून देण्याचा प्रताप याठिकाणी घडला आहे. यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्याचाच समावेश असल्याचे पुढे आले आहे.
कामगारांची वर्षाच लिडर : येळ्ळूर परिसरातील गावांमध्ये ज्या धनिक कुटुंबांना बीपीएल शिधापत्रिका मिळवून देण्यात आल्या आहेत, त्याच घरातील दाम्पत्यांना पेन्शनही मंजूर करुन देण्यात आली आहे. 50 ते 55 गटातील अनेक दाम्पत्यांना ते ज्येष्ठ नागरीक ठरण्यापूर्वीच बनावट कागदपत्रांच्या आधारे पेन्शन मंजूर करण्यात आली आहे. ही जादूची करामत स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्या काही कामगारांनी केली असून त्यांची लिडर ही वर्षाच आहे. तिनेच या सर्वांना हाताशी धरुन काम केले असून या कामात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा एक अधिकारी सहभागी झाला आहे.उचगाव सर्कलमधील पेन्शन स्कँडलचे जाळे थेट हिरेबागेवाडी सर्कलपर्यंत
जाऊन पोचले आहे. वर्षा आणि लक्ष्मीसह इतर दोन्ही महिला एजंटांनी सांबरा परिसरातही अपात्र लाभार्थीना पेन्शन मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. निवृत्त महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून सांबरा परिसरातीलही काही अपात्र लाभार्थी आता शासनाची पेन्शन घेण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळेच मुतगा, सांबरा परिसरातील काही लाभार्थीची चौकशी केली जाणार आहे. निवृत्त महसूल अधिकाऱ्याचा बेळगावच्या चारही विभागात दबदबा असून त्याने या महिलांना इतर सर्कलमधील नागरिकांचीही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत पेन्शन मंजूर करून देण्याची हमी दिली होती. त्यानुसार या महिलांनी आपल्या काही ओळखीच्या लोकांची यासाठी मदत घेत त्यांना सहाय्यक एजंट म्हणून मुतगा आणि सांबरा परिसरात नियुक्त केले आहे.
महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेळगाव तालुक्यातील उचगाव सर्कलमध्ये 400 हून अधिक अपात्र लोकांना पेन्शनचा लाभ मिळत आहे. यातून शासनाचे लाखो रुपये दरमहा गिळंकृत केले जात आहेत. त्यामुळे सध्या 35 वर्षांचा नागरिकही ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन मिळवत आहे. सावगाव, मंडोळी, हिंडलगा, बेळगुंदी, सुळगा गावांत असे अपात्र पेन्शनधारकांची संख्या अधिक आहे. उचगाव सर्कलमध्ये झालेल्या या बनावटगिरीमुळे तालुक्यातील इतर भागांत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडून पेन्शन सुविधा दिली. विधवा पेन्शन घेण्यासाठी पतीच्या निधनानंतर अपत्य लहान असल्यास अशा महिलेस विधवा पेन्शन दिली जाते. मात्र उचगाव सर्कलमध्ये मुले 18 वर्षे उलटून गेलेली असली तरी अनेक महिलांना अशी पेन्शन उपलब्ध करून दिली आहेत. आधार कार्डवर वय अधिक दाखवून अनेकांनी ज्येष्ठ नागरिक पेन्शनही मंजूर करून घेतली आहे. यासाठी 35 वर्षीय एकाचे वय 60 वर्षे दाखविले आहे. हे सर्व दाखलेही तहसीलमधून दिले आहेत. तहसीलमधीलच एका अधिकाऱ्याचा यात समावेश असल्याने कोणतीही अडचण न येताच पेन्शन मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीस पेन्शन मंजूर करायची असल्यास रितसर अर्ज करणे आवश्यक असते. या अर्जाची पडताळणी तलाठी व महसूल निरीक्षकाकडून'लक्ष्मी' आणि 'वर्षा'चे कारनामे जादा
चार एजंटांपैकी लक्ष्मी आणि वर्षा या दोन्ही महिला एजंटांनीच अधिक अपात्र लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करून दिल्या आहेत. 'रेश्मा' आणि 'सुधा' यांचे प्रमाण अत्यल्प आहे. 'समाजकारणा'च्या नावाखाली या दोघींनी बक्कळ माया जमविल्याची चर्चा असून काही जमिनींचे व्यवहारही सध्या त्या करीत आहेत. त्यामुळे तहसीलमधील इतर एजंट मात्र पिछाडीवर राहिले आहेत. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या दोघींविरोधात पुरावे जमा केले जात आहेत. तहसील कार्यालयातील एजंटराजमध्ये यापूर्वी केवळ पुरुषांचेच वर्चस्व होते. मात्र या महिलेने पुरुषांनाही मागे टाकले असून थेट अधिकाऱ्याला हाताशी धरुन अपात्र लाभार्थीना पेन्शन मंजूर करुन घेतली. यासाठी प्रत्येक लाभार्थीकडून 2,500 ते 3,000 हजार रुपये उकळल्याची चर्चा आहे. मात्र, निवृत्त अधिकाऱ्याकडे यातील किती रक्कम पोचली आहे, याचा उलगडा झालेला नाही. 400 अपात्र लाभार्थीचा हिशेब केल्यास ही एकूण रक्कम 10 ते 12 लाख रुपये होते. सध्या केवळ हा घोटाळा उपलब्ध माहितीनुसार आहे.
तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील काही गल्लीमध्येच सध्या बोगस पेन्शन लाभार्थी शासकीय पेन्शन मिळवित आहेत. यात उचगाव सर्कलमधील 'लक्ष्मी'चा बेळगाव तहसील कार्यालयात वाढलेला वावरच कारणीभूत ठरला आहे. उचगाव सर्कलमधील निवृत्त अधिकाऱ्याच्या ओळखीवरच ही सर्व खेळी सुरु झाली असून या अधिकाऱ्याच्या ओळखीतील काही तहसील कार्यालयातील कर्मचारी या प्रकरणात गुंतले आहेत. त्यामुळे हे रॅकेट संपूर्ण तालुक्यात पसरले असून त्याचा पर्दाफाश होण्याची गरज निर्माण झाली आहे.

अपात्र लाभार्थीना पेन्शन मंजुरीची माहिती आपल्याला मिळाली आहे. ज्याने अशी पेन्शन मंजूर केली आहे, ती व्यक्ती सध्या निवृत्त झाली आहे. मात्र अपात्र लाभार्थीची लवकरच माहिती घेतली जाणार असून तशा पेन्शन बंद केल्या जातील. सध्या गावागावांत घरोघरी जाऊन पेन्शनधारकांची माहिती घेतली जात आहे. व्ही. एम. गोठेकर, तहसीलदार (द्वितीय दर्जा), बेळगाव

Source - 'सकाळ' पेपर बेळगाव