goa_cyber-cell-arrests-karnataka-native-for-cheating-on-pretext-of-marriage-202010.jpg | लग्नाचे अभिवचन देत ऑनलाईन 23 लाखाला गंडा; Facebookवर युवतीच्या नावे खाते उघडून मैत्री | belgaum news | belgavkar बेळगावकर

लग्नाचे अभिवचन देत ऑनलाईन 23 लाखाला गंडा; Facebookवर युवतीच्या नावे खाते उघडून मैत्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

गोवा : लग्न करण्याचे अभिवचन देत ऑनलाईन पद्धतीने 23 लाख 21 हजार 68 रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी स्वप्नील नाईक या संशयितास दावणगिरी कर्नाटक येऊन सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आपली अज्ञात फेसबुक वापरकर्त्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार विष्णू गावडे (फोंडा) यांनी पोलिसात दिली होती. स्वप्नील याने आपण महिला असल्याचे भासवून गावडे यांच्याशी संपर्क केला होता. 27 जुलै ते 16 सप्टेंबर दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. Facebook वर युवतीच्या नावे खाते उघडून मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आपल्याला 23.21 लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार सायबर गुन्हे विभागात नोंदवली होती. गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी संशयित कुठे दडून बसला आहे याचा शोध घेणे सुरु केले. त्यानंतर दावणगिरी येथे तो दडून बसल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांचे एक पथक तेथे गेले आणि त्याला पकडून आणले आहे. याकामी कर्नाटक पोलिसांनी मदत केली.
या तक्रारीस अनुसरून सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुलीच्या नावे बोगस फेसबुक खाते उघडणाऱ्या स्वप्निल नाईक या भामट्याला अटक करून गोव्यात आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने फेसबुकवर एका मुलीच्या नावाने खाते उघडले. नंतर फोंड्यातील विष्णू गावडे यांच्याशी त्याने मैत्री केली. मेसेंजर वरून चर्चा करून प्रेमसूत जुळविले. नंतर त्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून 23 लाख 21 हजार 68 रुपये उकळले. ही रक्कम आपल्या खात्यात जमा करण्याची सूचना त्याने केली. प्रेयसीने पैसे मागितल्यामुळे तक्रारदार विष्णू गावडे यांनी त्याने सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. 21 जून 2020 ते 16 सप्टेंबर 2020 या काळात आरोपीने टप्प्या - टप्प्याने तक्रारदाराकडून बँक व्यवहारातून 23 लाख रुपये उकळलेले आहेत. 16 सप्टेंबर नंतर प्रेयसीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच गावडे यांनी सायबर विभागाच्या पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपी दावणगिरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक सतीश पडवळकर, उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे, हवालदार योगेश, पोलिस शिपाई सुयोग, बसुराज हडपट यांच्या पथकाने दावणगिरीला जाऊन संशयिताला अटक केली.
आरोपी सोशल मीडियावर युवतीच्या नावे अनेकांशी मैत्री करून त्यांची संपूर्ण माहिती मिळवित होता. बऱ्याचदा सोशल मीडियावर मित्रांकडून पैसे मागून खात्यात जमा करण्याची विनंती करीत होता. तर बऱ्याच वेळा त्यांच्या खात्याची माहिती मिळवून ब्लॅकमेलिंगही करीत होता, अशी प्राथमिक माहिती सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांना तपासात आढळून आली आहे. तत्पूर्वी संशयिताने सांगली, बंगळूर या ठिकाणीही प्रवास केला होता. समाज माध्यमावर आपणास मदतीची गरज आहे असे भासवून तो सावज हेरत होता अशी माहिती तपासानंतर पोलिसांच्या हाती आली आहे. याच संशयितास फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कुडचडे पोलिसांनी याआधी दोनवेळा पकडले होते.