बेळगाव—belgavkar—belgaum : हॉटेलमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादावादीनंतर गँगवाडी येथील एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी संगमेश्वरनगरजवळ ही घटना घडली असून यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रुक्मिणीनगर येथील एका युवकाला अटक केली आहे.
हाणामारी व चाकू हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेला युवक बीएसएफचा जवान असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सध्या तो सुटीवर आला होता. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी पुढील तपास करीत आहेत.
गुरुवार दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री संगमेश्वरनगरजवळील एका मांसाहारी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. गँगवाडी येथील अनिल, अजय, राहुल हे जेवणासाठी गेले होते. बिलावरुन हॉटेलमालक व जेवणासाठी गेलेल्या तरुणांमध्ये वादावादी झाली. फोन पे च्या माध्यमातून पैसे जमा होण्यास विलंब झाल्यामुळे हा वाद सुरू होता. त्याचवेळी किती आवाज करतोस? अशी विचारणा करीत एका युवकाने अल्ताफ (वय 28) याच्यावर चाकू हल्ला केला. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रुक्मिणीनगर येथील परशराम लक्ष्मण रामगोंडन्नावर (वय 33) याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.