India beat the weather and the clock to sweep Bangladesh aside : India vs Bangladesh 2nd Test : भारतात कसोटी क्रिकेट खेळताना भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने मायदेशात खेळताना एकही कसोटी सामना गमावलेला नाही. यात एका मालिकेची भर पडली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा चांगलाच समाचार घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 ने सुपडा साफ केला आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 280 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा दारुण पराभव केला आहे. या सामन्यातील 3 दिवस पावसामुळे धुतले गेले. मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि विजय खेचून आणला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बांगलादेशकडून फलंदाजी करताना मोमिनूल हकने सर्वाधिक 107 धावांची खेळी केली. तर शदमन इस्लामने 24 आणि कर्णधार नजमूल शांतोने 31 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने 233 धावांपर्यंत मजल मारली.
भारतीय संघाला सामन्यातील चौथ्या दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ड्रॉ होणारा सामना जिंकण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा पाऊस पाडला आणि सर्वात वेगवान धावांचा रेकॉर्डब्रेक करत स्कोअरबोर्डवर 9 गडी बाद 285 धावा लावल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 68 आणि विराट कोहलीने 47 धावांची खेळी केली. पहिल्या डावात 233 धावांपर्यंत मजल मारणाऱ्या बांगलादेशला दुसऱ्या डावात 146 धावा करता आल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शदमन इस्लामने 50 धावांची खेळी केली. तर शेवटी मुशफिकुर रहीमने 37 धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या. 146 धावांवर आटोपला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 95 धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने शानदार खेळी केली.