बेळगाव—belgavkar—belgaum : जमिनीतील वाटेच्या वापरावरुन आमटूर (ता. बैलहोंगल) येथील एका शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून त्यांच्याच जवळच्या नातेवाईकांनी हे कृत्य केले आहे. यासंबंधी तिघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे. केदारी यल्लाप्पा अंगडी (वय 41, रा. आमटूर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
केदारीचा जवळच्या नातेवाईकांनीच खून केला आहे. बाळाप्पा शिवानंद अंगडी, शिवानंद बाळाप्पा अंगडी, आत्मानंद शिवानंद अंगडी या तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. संशयित आरोपी शिवानंद व खून झालेला केदारी काका-पुतण्या आहेत. जमीनही सामाईक आहे. केदारीला न विचारता आपल्या शेजारच्या शेतातील रामाप्पा कलगगरी या शेतकऱ्याला शेतातील रस्ता वापरण्यास मुभा देण्यात आली होती.
सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेलेल्या केदारीवर चाकूने हल्ला केला. चाकू हल्ल्यात केदारीचा मृत्यू झाला आहे. छाती व पोटावर वार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.