बेळगाव—belgavkar—belgaum : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम होतील. 2 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता गांधी ज्योती पदयात्रा काढण्यात येईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
सोमवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 136 काँग्रेस आमदारांनी मतदारसंघात आपल्या आयोजित कार्यक्रमात सक्तीने भाग घ्यावा. आमदार नसतील तर विधान परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करावा. बेळगावात डिसेंबर 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशन झाले होते. त्यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या तत्त्वांचे पालन आजही होत आहे. त्यांच्या योगदानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्याचा सल्ला नियोजन समितीने दिल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.