बेळगाव—belgavkar—belgaum : बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 43 तोळे सोने, 16 तोळे चांदीच्या दागिन्यांसह पन्नास हजारांची रोकड असा सुमारे ₹ 35 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कोकटनूर (ता. अथणी) येथे घडली. आठ दिवसांत अथणी शहरानंतर कोकटनूर येथे मोठी घरफोडी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नूरअहमद कावरे यांच्या घरी ही चोरी झाली.
आठ दिवसांपूर्वी अथणी शहरात एकाच रात्रीत दहा घरे फोडून सोन्याचे दागिने, रोक रक्कम व लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना कोकटनूर येथे घरफोडी झाली आहे. कावरे यांच्या घराला बाहेरुन कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले. शनिवारी रात्री कावरे यांच्या घरालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात तीन तरुण कैद झाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांच्या तपासाला गती आली आहे. याबाबत ऐगळी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, रवींद्र नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुमार हडकर, पीएसआय राकेश बगली, चंद्रशेखर नागनूर यांनी तपास पथके ठिकठिकाणी पाठवली आहेत. अद्याप चोरट्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.