बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव शहरामध्ये गणेशोत्सव, दसरा आणि दिपावली सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक जाहिराती या मराठीमध्ये लावलेल्या आहेत. मात्र त्यामुळे कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांना पोटशूळ झाला असून सोमवारी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कन्नडमध्ये जाहिरात फलक लावा, अन्यथा आम्ही स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यापूर्वीही अनेकवेळा अशाप्रकारे दडपशाही करण्यात आली आहे. सीमाभागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक राहतात. तसेच इतर भाषिकही राहत आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. मात्र कन्नड संघटना आपले वर्चस्व दाखविण्यासाठी नेहमीच अशाप्रकारे जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.
केवळ शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम या संघटना करत असल्याचा आरोप आता होत आहे. सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोरच लाल-पिवळ्या रंगाचे झेंडे घेऊन या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले. मात्र त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला. मोजकेच कार्यकर्ते होते, पण त्यांच्यापेक्षा पोलीसच अधिक तैनात करण्यात आले होते.