बेळगाव—belgavkar—belgaum : रोहयो कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार कडोली ग्रा. पं. मध्ये घडला आहे. यामुळे ग्रा. पं. अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी (पीडीओ), ता. पं. सहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांसह 8 जणांना 29 लाख 19 हजार 663 रु. दंड ओम्बड्समैननी (ombudsman) ठोठावला आहे.
कडोली ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील यांना 8 लाख 73 हजार 799 रु., पीडीओ कृष्णाबाई भंडारी, ता. पं. सहाय्यक कार्यकारी अधिकारी शिवानंद मडीवाळर यांना प्रत्येकी 8 लाख 74 हजार, 799 रु., ग्रा. पं. संगणक ऑपरेटर नलिनी नायक 2 लाख 92 हजार, सहाय्यक कार्यकारी अभियंता सुंदर कोळी, ता. पं. सहाय्यक कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोरबद, सविता एम., नागराज यरगुद्दी यांना प्रत्येकी ₹ 1000 रु. दंड जि. पं. चे ओम्बडुसमन डॉ. डी. एस. हवालदार यांनी ठोठावला आहे. रोहयो 2005, कलम 25 अन्वये त्यांनी ही कारवाई केली आहे.
कडोली ग्रा. पं. ने रोहयोतून मार्कंडेय नदीतील रस्ताकामाचे सप्लाय बिल दाखवून ट्रॅक्टरचे भाडे दिले. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रा. पं. सदस्य राजू मायण्णा व 9 सदस्यांनी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 6 जुलै रोजी केली होती. याबाबत 30 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहावे, अशी नोटीस 29 जुलै रोजी देण्यात आली. चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी 30 रोजी कडोलीला भेट दिली. त्यावेळी तक्रारदार आणि विरोधकांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. मार्कंडेय नदीमध्ये पाणी असल्याने घटनास्थळी जाता आले नाही. यामुळे उपलब्ध छायाचित्रे व कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्यात आली. यामध्ये कामगारांच्या माध्यमातून काम केल्याचे आढळले. परंतु यासाठी वापरलेल्या सामग्रीबाबत तफावत आढळली. यामुळे ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी ट्रॅक्टरचा वापर केल्याचे मान्य करुन आपणाला 21 दिवसांचे प्रत्येक दिवसाला ₹ 3000 प्रमाणे 1 लाख 26 हजार मिळाल्याचे सांगितले. यामुळे ग्रा. पं. अध्यक्ष, पीडीओ, तांत्रिक सहाय्यक अभियंता, संगणक ऑपरेटर यांच्याकडून दंड वसूल करण्याचे आणि कारवाईचे आदेश बजावले आहेत.
नियमांचे उल्लंघन : ग्रा. पं. ने नियमांचे उल्लंघन करुन नदी पुनर्भरणासाठी आपल्या पातळीवर निर्णय घेतला. यासाठी दरपत्रक तयार करुन साहित्य म्हणून ट्रॅक्टर व ट्रॉली आणि वेगवेगळे किरकोळ खर्च दाखविले. सामग्री म्हणून वापर करण्यास परवानगी नसलेल्या गोष्टींचा वापर केला. यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर झाल्याचे आढळून आले.