Belgaum getting set to celebrate centenary of historic 1924 session of Congress helmed by Mahatma Gandhiबेळगाव—belgavkar—belgaum : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात 1924 मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची शताब्दी भव्य पद्धतीने साजरी करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने चालविली आहे. महात्मा गांधी यांनी अध्यक्षपद भूषविलेले ते एकमेव अधिवेशन असल्याने पक्षाने शताब्दी कार्यक्रम आयोजनात कोणतीही कसूर न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगावात अधिवेशनाचा शताब्दी सोहळ्याच्या आयोजनाची रुपरेषा आखण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक बंगळूरमध्ये झाली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह बहुतेक मंत्री यावेळी उपस्थित होते. अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना यापूर्वीच अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. राज्य सरकारप्रमाणेच काँग्रेस पक्षही महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची शताब्दी स्वतंत्रपणे साजरी करणार आहे. पक्षासाठी हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. हा क्षण पक्ष विविध उपक्रमांनी साजरा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिली. मात्र, कार्यक्रमांचे स्वरुप त्यांनी स्पष्ट केले नाही.
बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाची शताब्दी साजरी करण्यासाठी राज्य सरकारने ₹ 2 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. निधीची घोषणा झाल्यानंतर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महिन्यापूर्वी पूर्वतयारी बैठक घेऊन कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत मते जाणून घेतली होती. या बैठकीला स्वातंत्र्य सैनिकांसह नामवंतांनी भाग घेऊन सूचना मांडल्या होत्या.
अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त सर्वसमावेशक लघुपट तयार करावा. खादी कपड्यांवर सवलत जाहीर करावी. लोकांना अधिवेशनाची माहिती व्हावी यासाठी पुस्तिका प्रकाशित करुन वाटावी. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आयोजित कराव्यात. अधिवेशन काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवावा, आदी सूचना बैठकीवेळी मांडण्यात आल्या होत्या. सर्वांची मते जाणून घेऊन जिल्हाधिकारी रोशन यांनी कार्यक्रम ठरविण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनही स्वतंत्ररित्या शताब्दी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने सोहळ्याला भव्य स्वरुप प्राप्त होणार आहे.