बेळगाव—belgavkar—belgaum : रंगपंचमीवेळी 'जय, जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' हे गाणे लावल्याचा राग धरत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात रंगपंचमीला डॉल्बीचा दणदणाट सुरु असताना चव्हाट गल्लीतील युवकांवर सुओ-मोटो गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे..
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी होलिकोत्सव (रंगपंचमी) साजरा झाला. अनेक ठिकाणी डॉल्बीचा दणदणाट सुरु होता. दरवर्षीप्रमाणे चव्हाट गल्लीतील युवकांनीदेखील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रंगपंचमीसाठी थंड शॉवरची सोय करून डॉल्बी लावली होती. त्यांच्याकडून शहरातील इतर भागासारखीच रंगपंचमी सुरु होती. परंतु, त्यांनी डॉल्बीवर 'जय, जय महाराष्ट्र माझा...' हे गाणे लावले होते. यामुळे तीळपापड झालेल्या पोलिसांनी याविरोधात तिघांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
यामध्ये वैभव गावडे (रा. गोजगा), सुनील जाधव (रा. चव्हाट गल्ली) व डॉल्बी ऑपरेटरचा समावेश आहे. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सुओमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे. मार्केटचे हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन गुंजीकर यांनी फिर्याद दिली आहे, त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 14 मार्च रोजी दुपारी 12.30 वा. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रस्त्यावरच डॉल्बी लावण्यात आली होती. त्यांनी यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेतलेली नव्हती. सार्वजनिक दळणवळणाला अडथळा होईल, अशा पद्धतीने त्यांनी दोन्ही बाजूला डॉल्बी लावलेली होती. ती कर्णकर्कश आवाजात लावून आजुबाजूच्या लोकांना नाहक त्रास झाला. आजुबाजूचे तरुण येथे नाचत असताना डॉल्बीवर 'जय, जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' हे गाणे सुरु होते.
यामुळे भविष्यात भाषिक तेढ निर्माण होऊ शकते, सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो, असे म्हणत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी शहरात सर्वत्र डॉल्बीचा दणदणाट सुरु होता. यापैकी किती जणांनी परवानगी घेतली होती, हेदेखील पाहावे लागणार आहे. चव्हाट गल्लीतही दरवर्षी अशा पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते. परंतु, यंदा त्यांनी 'जय, जय महाराष्ट्र माझा' हे गीत लावल्याचा राग कर्नाटकी प्रशासनाला असल्याचे यावरून दिसून येते. याबाबत मराठी भाषिकांतून संताप व्यक्त होत आहे.
