बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा पंचायतीत नोकरी लागल्याचे सांगून बनावट लेटरहेडवर नियुक्ती करणाऱ्या दोघांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश आणि कार्तिक अशी त्यांची नावे समोर आली असून, मार्केट पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत मार्केट पोलिसांची माहिती अशी की, कु. कविता महावीर मादर व सिद्धलिंग शिवाप्पा तळवार (दोघेही रा. नंदेश्वर जनता प्लॉट, ता. अथणी) या दोघांना तुमची जिल्हा पंचायतीत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याचे सांगत अनोळखी क्रमांकावरून फोन गेले. रमेश व कार्तिक या दोघांनी हे फोन करून त्यांना ही माहिती दिली. यानंतर या भामट्यांनी कविता यांना नकली नियक्तिपत्र ई- मेलद्वारे पाठवले. हे पाठवताना या भामट्यांनी सदर तरुणीकडून वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली आहे, असे सांगत ₹ 9000 रुपयांची रक्कम फोन पेद्वारे मागून घेतली. असाचं प्रकार सिद्धलिंग बरोबरही केला. तुझी कंत्राटी पद्धतीवर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नियुक्ती झाली आहे. लवकर येऊन हजर हो, असे म्हणत त्यालाही नकली ऑर्डर व किती पगार आहे, याची पे स्लीप देखील पाठवून दिली. तुझीही वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली आहे, असे सांगत त्याच्याकडून फोन पेद्वारे 11 हजाराची रक्कम मागवून घेतली.
आपली नियुक्ती झाली असल्याचे समजून दोघेही बेळगाव जिल्हा पंचायतीत गेले. त्यांनी त्यांच्याकडील नियुक्तीपत्र व जिल्हा पंचायतीचे लेटरहेड दाखवले. परंतु, अशी कोणतीही नियुक्ती जिल्हा पंचायतीकडून झाली नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही फसवणूक असल्याचे लक्षात येताच जिल्हा पंचायतीचे सहाय्यक सचिव राहुल आण्णाप्पा कांबळे यांनी यासंबंधीची फिर्याद मार्केट पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी याची नोंद करून घेतली आहे. संबंधितांवर फसवणूक, विश्वासघात यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस निरीक्षक महांतेश धामण्णवर तपास करत आहेत.