बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव तालुक्यासह खानापूर आणि इतर तालुक्यात मुसळधार पावसामुळे 22 ते 27 जुलैपर्यंत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, झालेले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी शनिवारपासून (दि. 17 ऑगस्ट) 6 शनिवारी दिवसभर शाळा भरवावी असा आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली होती. आता सुटीमुळे झालेले शालेय नुकसान भरुन काढण्यासाठी 6 शनिवार पूर्ण वेळ शाळा भरविली जाणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सुरवातीला 10 ऑगस्टपासूनच पूर्ण दिवस शाळा भरविण्याचा आदेश दिला होता. मात्र, अजून पाऊस सुरु आहे. तसेच शुक्रवारी (दि. 9 ऑगस्ट) नागपंचमी असल्याने पुढील आठवड्यातील शनिवारपासून पूर्ण दिवस शाळा घ्यावी, अशी विनंती शिक्षक संघटनेने केली होती. याची दखल घेऊन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट पासून शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविण्याची सूचना केली आहे.
पावसामुळे शाळांना सलग सहा दिवस सुट्टी दिल्याने अभ्यासक्रम मागे पडला आहे. त्यामुळे परिक्षांचे वेळापत्रकही कोलमडणार आहे. रोजच्या वेळेत अभ्यासक्रम भरून काढणे शक्य होणार नसल्याने शनिवारी पूर्ण ठिकाणी वेळ शाळा घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.