कर्नाटक : भाजप-धजद आपल्याला टार्गेट करून आमचे काँग्रेस सरकार (Congress Government) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते यशस्वी होणार नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. म्हैसूरमध्ये कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, सिद्धरामय्या गरीबांसाठी काम करत आहेत. यासाठीच पंचहमी योजना राबवल्या आहेत. भाजप-धजदला हे सहन होत नाही. त्यासाठी ते माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप-धजदचा पंचहमी योजनांना सुरुवातीपासूनच विरोध होता. पंतप्रधान मोदीही पंचहमी योजनांच्या विरोधात बोलत होते. वर्षापासून पंचहमी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. हे सहन न झाल्याने त्यांनी माझ्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप-धजदच्या खोट्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नाही. खोटे बोलल्याने यश मिळत नाही.
यापूर्वी त्यांनी ऑपरेशन कमळ करून माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. आता त्यांनी माझ्यावर निशाणा साधून सरकारला पाडण्यासाठी खोटे आरोप करत आहे. भाजप-धजद तुम्हाला पाहून घाबरतात का, या प्रश्नाला उत्तर देताना, सत्याचा नेहमीच विजय होतो, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
येडियुराप्पांनी राजकीय संन्यास घ्यावाते म्हणाले, येडियुराप्पांना माझा राजीनामा मागण्याची नैतिकता आहे का? आता ते पोक्सो प्रकरणात अडकले आहेत. न्यायालयाच्या कृपेने ते तुरुंगात न जाता बाहेर आहेत. ते 82 वर्षांचे आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. येडियुरप्पा आपली कोणती नैतिकता राखून राजीनामा मागत आहेत. त्यांच्यावर 18-20 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पैसे घेऊन डिनोटिफिकेशन केले होते. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिली होती. येडियुराप्पा यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेणे चांगले आहे. त्याच्या काळातील घोटाळा दाखवू. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा जंत्कल खाण घोटाळा, भाजपचा प्रशासन घोटाळा, भोवी निगम घोटाळा, देवराज अर्स ट्रक टर्मिनल घोटाळा या सर्व घोटाळ्यांचा भांडोफोड करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.