बेळगाव—belgavkar—belgaum : खरेदीसाठी चंदगडहून बेळगावला आलेल्या एका युवकाच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री खडेबाजार येथे ही घटना घडली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मोहसीन आयुब नाईक (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
केए 01 एमपी 7082 क्रमांकाच्या कारमधून ते बुधवार दि. 12 मार्च रोजी रात्री खरेदीसाठी बेळगावला आले होते. खडेबाजार येथील बॉम्बे सायकल शॉपसमोर कार उभी करून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी खरेदी केली. 1.45 वाजण्याच्या सुमारास ते कारजवळ परतले. त्यावेळी काचा फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
एअरगनचा वापर करून काचा फोडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मध्यरात्री यासंबंधी अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून काचा फोडणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर पुढील तपास करीत आहेत.
