बेळगाव—belgavkar—belgaum : दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळवले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास महांतेशनगरमध्ये घडली. हे मंगळसूत्र 3 तोळ्यांचे असून, याची किंमत सुमारे 2 लाख रुपये होते. याप्रकरणी उमा महेश्वर मल्लापूर (रा. महांतेशनगर) यांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी उमा व त्यांची नणंद प्रेमा मल्लापूर या दोघी हॉस्पिटलला गेल्या होत्या. तिकडून परतताना रात्री आठच्या सुमारास दोघी अंजनेयनगरमधील अरिहंत बिल्डिंगजवळून निघाल्या. त्या एका फायनान्सजवळ पोहोचल्या.
त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने उमायांच्या गळ्यातील मंगळसूत्राला जोराचा हिसडा मारला. तीन तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून भामट्यांच्या हाती लागताच त्यांनी पोबारा केला. पोलिसांनी याची किंमत 90 हजार नोंदवली असली, तरी सध्याच्या बाजारभावानुसार याची 2 लाखांवर किंमत होते. माळमारुती पोलिसांत नोंद झाली असून, निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची तपास करीत आहेत.
