बेळगाव—belgavkar—belgaum : येथील उज्ज्वलनगरमधील नाल्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळाला. त्याचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षे असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. बुधवारी दु. 3 च्या सुमारास उज्ज्वलनगर दहावा क्रॉसपासून जवळच असलेल्या नाल्यातून एक मृतदेह वाहत येऊन तो झाडाच्या फांदीला अडकला.
आजूबाजूच्या लोकांना याची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. ही माहिती माळमारुती पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या शवागरात पाठवण्यात आला.
त्याच्या अंगात पूर्ण बाह्यांचा पिवळा शर्ट, निळी हाफ जीन्स पॅन्ट व काळा बेल्ट आहे. त्याच्या उजव्या हातावर संतोष असे इंग्रजीमध्ये गोंदण आहे. त्याच्या शर्टाच्या कॉलरवर हॅपी मेन्स विअर बेळगाव, असे लेबल आहे. या तरुणाबाबत माहिती मिळाल्यास माळमारुती पोलीस ठाण्याशी संपर्क (0831-2405251 अथवा 9480804107) साधावा, असे आवाहन केले आहे.