Bihar in shock as nursery student brings handgun to school, shoots schoolmate : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज इथं घडलेल्या एका प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. याठिकाणच्या लालपट्टी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलाला गोळी मारली आहे. या घटनेत विद्यार्थ्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. नर्सरीतील मुलगा शाळेच्या बॅगेत बंदूक घेऊन पोहचला होता.
शाळेत घडलेल्या गोळीबारात जखमी मुलाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घडलेल्या प्रकाराने शाळेत खळबळ माजली आहे. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून नर्सरीतील मुलाकडे बंदूक कुठून आली याची चौकशी पोलीस करत आहेत. आरोपी विद्यार्थ्याचे वडील याच शाळेत सुरक्षा रक्षकाचं काम करत होते. ही घटना शाळेतील प्रार्थनेच्या अगोदर घडली आहे.
जखमी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील मुख्याध्यापकांनी मुलाला गोळी लागल्याचं कळवलं. मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, तुम्ही लवकर या असा निरोप शाळेने पालकांना दिला. आरोपी मुलाच्या वडिलांना ही माहिती कळताच ते तातडीने शाळेत पोहचले आणि मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेली बंदूक आणि मुलाला घेऊन शाळेतून फरार झाले. त्यांनी सोबत आणलेली बाईक शाळेतच सोडली.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलाच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. एक छोटा चिमुकला हा गोळी चालवू शकतो त्यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. आरोपीच्या आई वडिलांचीही चौकशी करा असं त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
नर्सरीच्या विद्यार्थ्याने 10 वर्षीय मुलावर गोळी चालवली, जो शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. गोळी त्याच्या डाव्या पायाला लागली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. अखेर नर्सरीच्या मुलाच्या हातात बंदूक कशी आली याची चौकशी आम्ही करत आहोत. आम्ही जिल्हाभरातील शाळांमधील मुलांच्या बॅगा नियमित तपासाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत असं पोलीस अधीक्षक शैशव यादव यांनी सांगितले.