बेळगाव—belgavkar—belgaum : (खानापूर रोड मराठा मंदिर शेजारील) इंद्रप्रस्थनगर येथील विसर्जन तलाव कोरडा ठेवावा, या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून महापालिकेचे लक्ष वेधले आहे. तलावात पुन्हा पाणी सोडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जक्कीनहोंड येथील रामतीर्थ विसर्जन तलावात गणेशमूर्तीचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते.
विसर्जन केल्यानंतर तलावातील मूर्ती काढून पुन्हा पाणी भरले जाते. मात्र, विसर्जन तलावात जनावरे सोडली जात असल्याने आणि कचरा साचल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, रोगराई बळावत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी डेंगीमुळे या भागातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी इंद्रप्रस्थनगर आणि परिसरातील नागरिकांनी रामतीर्थ तलाव परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. तसेच, तलावही कोरडा केला आहे. इंद्रप्रस्थनगरातील रामतीर्थ तलावात (जक्कीनहोंड) पुन्हा पाणी सोडून गवळी समाजाची गैरसोय दूर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पुन्हा पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तलावात पाणी सोडू नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली आहे. जनावरांसाठी तलावात पुन्हा पाणी सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी भागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या
