बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी तालुक्यातील शिनाळ येथे शनिवारी दुपारी भरदिवसा रस्त्याकडेला असलेल्या घरात मुलीचे हातपाय बांधून सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली. येथील आदर्श नगरमधील मारुती बजंत्री असे संबंधित घरमालकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, मारुती बजंत्री हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दरम्यान यावेळी बजंत्री यांची मुलगी घरात एकटीच होती. यावेळी आलेल्या दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मुलीचे हातपाय बांधले. यानंतर घरातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. काहीवेळाने मुलीने आरडाओरड केल्यानंतर सदर घटनेचा उलगडा झाला.
घटनेची माहिती अथणी पोलिसांना देताच डीवायएसपी प्रशांत मुनोळी, सीपीआय संतोष हळ्ळूर यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. चोरट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पथके तयार करण्यात आली आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत महिनाभरापासून अथणी तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाच महिन्यापूर्वी एकाच रात्रीत चमकेरी रस्त्यानजीकच्या 10 घरांमध्ये चोरी केली होती. तर दोन महिन्यांपूर्वी कोहळ्ळी येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला होता.
