बेळगाव—belgavkar—belgaum : दहावीच्या परीक्षेला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे, तरीही दहावीच्या निकालात वाढ व्हावी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त अभ्यास करावा, यासाठी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 20 मार्चपर्यंत शाळेत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावीच्या निकालात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या निकालात वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून, दरवर्षी दहावीची परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांना काही दिवस घरातून अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र, यावेळी शिक्षण खात्याने परीक्षेला सुरुवात होण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची स्पष्ट सूचना केली आहे. तसेच, सर्व शाळांनादेखील या नियमांचे पालन करा, अशी सूचना करण्यात आलो आहे.
राज्यात शैक्षणिक हब म्हणून ओळख असलेल्या बेळगाव जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यामध्ये वेळगाव व चिक्कोडी असे 2 शैक्षणिक जिल्हे निर्माण करण्यात आले असून, सुरुवातीपासूनच चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल आंचक प्रमाणात लागत आहे. परंतु, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची सुरुवातीपासूनच घसरण होत असल्याने दरवर्षी निकाल वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असल्याची माहिती दिली जाते. परंतु, निकालात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे.
2024 मध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा निकालात 29 व्या क्रमांकावर होता. तर 2023 मध्ये 26, 2022 मध्ये 26, 2021 मध्ये 18 तर 2019 मध्ये 31 व्या क्रमांकावर होता. तर, राज्यातील इतर जिल्हे निकालात पुढे होते. गेल्या वर्षीपासूत दहावीतील विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने पास व्हावेत यासाठी 3 वेळा परीक्षा घेतली जात आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी शिक्षण खाल्याने दहावीच्या पहिल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 21 मार्चपासून दहावीच्या पहिल्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. तसेच, दहावीच्या निकालात वाढ व्हावी यासाठी पहिल्याच परीक्षेत विद्यार्थी अधिक प्रमाणात पास व्हावेत यासाठी सर्व शाळांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत
