बेळगाव—belgavkar—belgaum : महाराष्ट्र-कर्नाटकातील बस वाहतूक सुरु व्हावी, यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीतून प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर वाहतुकीला सुरुवातही झाली. परंतु, कलबुर्गी येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला पुन्हा काळे फासण्यात आले असून लाल-पिवळा झेंडा लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे भाषिकवाद पुन्हा उकरून काढू नका, तसेच संबंधितांवर लवकर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मागील आठवड्यात बसकंडक्टर आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीच्या प्रकरणाला भाषिक रंग देण्यात आला. त्यानंतर चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला काळे फासण्यासह चालक व वाहकालाही काळे फासण्यात आले. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. सीमेलगतच्या दोन्ही राज्यांच्या बसवर हल्ला करण्यात आला. यामध्ये परिवहन मंडळाचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन्ही राज्यांमधील बससेवा बंद झाली होती. अशा घटना घडत असताना सामाजिकदृष्ट्या शांतता पसरविण्यासाठी म. ए. समितीकडून याबाबत भाष्य केले. परंतु, प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले.
यानंतर वाद शमविण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक होऊन बससेवा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. परंतु, कलबुर्गी येथे महाराष्ट्र बसला शनिवारी पुन्हा काळे फासण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाषिक अल्पसंख्याक आयोगाने केलेल्या सूचनांप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर आदी उपस्थित होते.
