
महाराष्ट्र : गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होते. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली होती. त्यातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून लोकांमध्ये संताप पसरला. आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अडीच महिन्यात जिल्ह्याचे, गावाचे, समाजाचे नुकसान झालंय ते कोण भरून देणार, ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं सांगत आरोपीचं समर्थन करणारी टोळी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही, तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची 10 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्याचे अपहरण करण्यात आले होते. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो व्हायरल झालेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत. कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे. संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केली.संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांना सीआयडीने मुख्य आरोपी घोषित केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याच्या 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पुरावा सादर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी हैवानाला लाजवेल असे काम केले आहे.
